राजापूर, पुढारी वृत्तसेवा : सरसेनापती बापूसाहेब गोखले यांचे जन्मस्थान असलेल्या राजापूर तालुक्यातील प्रिंदावण गावातील जि. प. प्राथमिक शाळा नंबर २ (तळेखाजण ) इमारतीचे छप्पर पार मोडकळीस आले आहे. येत्या पावसाळयापूर्वी या इमारतीची दुरूस्ती न झाल्यास ही शाळा जमीनदोस्त होण्याची भिती निर्माण झाली आहे. दरम्यान दोन वर्गखोल्याच्या या शाळेतील एक खोली पूर्णत: नादुरुस्त आहे. तर दुसऱ्या खोलीत विद्यार्थ्यांना बसविले जात असून अक्षरश: जीव मुठीत धरुन विद्यार्थ्यी वर्गात बसत आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षाच्या कालावधीत पूर्ण बंद असलेल्या प्राथमिक शाळा अलिकडेच सुरु झाल्या आहेत. मात्र, प्रिंदावन येथील शाळा इमारतीची झालेल्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी बसविणे धोकादायक बनले आहे. या शाळेच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी मागील एक ते दीड वर्षांपासून सरपंच, सभापती आणि आमदार यांच्याकडे अर्ज विनंत्या करूनही शाळेच्या छप्पर दुरूस्तीबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मालकीची ही शाळा दोन वर्गखोल्यांची असून त्यापैकी एक खोली मोडकळीला आली आहे. विद्यार्थ्यी जीव मुठीत धरुन वर्गात बसत आहेत. सदर शाळा चौथीपर्यंत असून तेथे एक शिक्षक कार्यरत आहे . मात्र दरवर्षी रस्ते, पाखाडया व अन्य विकासकामांवर कोटयावधी रूपयांचा खर्च करणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे या शाळेच्या छप्पर दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध न होणे, ही बाब शोभनीय नसल्याची टीका ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तालुका पंचायत समित्याही शिवसेनेच्या अधिपत्त्याखाली आहेत. मात्र, शिक्षणासारख्या अती महत्वाच्या बाबीकडे लक्ष पुरविण्याचे गांभिर्य सदस्य व लोकप्रतिनिधींना नसल्याने तळेखाजण शाळेत शिकणाऱ्या मुलांना जीव मुठीत घेऊन अध्ययन करावे लागत आहे. त्यामुळे जीवित हानीचा धोका संभवू शकतो. ही बाब अनेकवेळा प्रत्यक्ष निदर्शनास आणूनही त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सरसेनापती बापूसाहेब गोखले यांच्यासारखे नरवीर प्रिंदावण गावात जन्मलेले असताना आणि उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य घडविणारी पिढी या शाळेत शिकत आहेत. मात्र, आज या शाळेची विदारक अवस्था बनली आहे. गेल्या १० ते १५ वर्षापूर्वीच या शाळेच्या इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र, एवढया अल्प कालावधीतच इमारतीची दुरवस्था झाली आहे. तरी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे .
राजापूर पंचायत समितीच्या सभापती करुणा कदम यांच्या पंचायत समिती गणातील ही शाळा आहे. त्या शाळेच्या दुरुस्तीसाठी त्यांनी देखील प्रयत्न केले आहेत. मात्र, अद्यापही शाळेच्या मागचे शुक्लकाष्ठ संपलेले नाही. सभापतींच्या गणातील शाळेची एवढी दुरवस्था पहायला मिळणे हे खेदजनक असल्याची संतप्त भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here