रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वीज भरणा वरून अनेक गोंधळ निर्माण होत आहेत. काही शाळांची तर वीज पुरवठा खंडित करण्याचे प्रकारही घडले आहेत. शेवटी यावर आता जि.प.ने सौरऊर्जेचा पर्याय शोधला आहे. तसा प्रस्ताव राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या ऑनलाईन बैठकीत जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी ठेवला आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदभवनात अविरत वीज वापरामुळे येणार्‍या भरमसाठ वीज बिलावर पर्याय काढण्यासाठी ‘सौर वीजनिर्मिती’चा वापर होत आहे. त्यासाठी अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यकमांतर्गंत जिल्हा परिषद इमारतीसाठी 59 लाख रुपये खर्च करण्यात आला होता. सौर वीज निर्मिती यंत्रणा जि.प.भवन इमारतीच्या छतावर 388 पॅनल बसविण्यात आली आहे. सौरपॅनेलच्या माध्यामातून वीज निर्मिती होत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उर्जा विकास कार्यकमातून जि.प. व पं.स.कार्यालयांच्या इमारतींवर ‘रुफटॉप नेट मिटरिंग’ सैर विद्युत संच बसविण्यात आले आहेत. त्यासाठी एकूण 87 लाख 69 हजार 852 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती.

जिल्हा परिषद इमारतीला वर्षाला सुमारे 2 लाख 19 हजार 832 युनिट विजेची गरज लागते. तर महिन्याला 11 हजार 500 युनीट वीज लागते. त्याचे बिल महिन्याला सरासरी दीड लाख रुपयांपर्यंत येते. जिल्हा परिषद भवनातील या सौर यंत्रणेमुळे वीज बिलाच्या सुमारे 30 लाख 24 हजार रुपयांची बचतीस हातभार लागला आहे. शासनाने सौरऊर्जा निर्मितीला पाधान्य दिले आहे. जिल्हा परिषदेला सौरपॅनेलमधून 3 ते 4 हजार युनीट वीज अधिक मिळते. त्यामुळे वर्षाचे सुमारे पंधरा लाख रुपयांची बचत होणार आहे.

सौरऊर्जा वीजनिर्मीतीला जिल्हा परिषदस्तरावर पाधान्य दिले जात असताना आता रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या इमारतींमधील वीज बिलांचा प्रश्न सोडविण्यासाठी लक्ष वेधण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी सौर ऊर्जेचा प्रस्ताव ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या जि.प. शाळा, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणी छतांवर सौर पॅनल बसविण्याबाबत प्रस्ताव सुचविला आहे. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या एका ऑनलाईन बैठकीत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सदरचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहीती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.

जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांचे वीज बिल भरण्याचा प्रश्न असतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विजेचा वापर कमी करण्यासाठी सौर पॅनेल बसवून सौर ऊर्जेचा वापर केल्यास वीज बिले कमी रक्कमेची येण्यास मदत होईल. हा आर्थिक ताण जिल्हा परिषदेला कमी होऊ शकतो. जिल्हा परिषद कृषी विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा उपाय करू शकतो, अशी माहिती अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्राचाही पुरवठा खंडित…

महावितरणने या वीज भरणाच्या गोंधळात अत्त्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य यंत्रणेलाच धक्‍का दिल्याचा प्रकार गेल्या महिन्यात उघड झाला होता. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला होता. मात्र चार ते पाच तासातच संगमेश्‍वरचे सभापती जया माने यांनी योग्य हालचाल करत हा पुरवठा सुरळीत केला होता. मात्र तोपर्यंत हे केंद्र अंधारातच चाचपडत होते. डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आरोग्य यंत्रणेचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे स्पष्ट आदेश महावितरणला देऊनही हा पुरवठा खंडित करण्यात आला होता.

हेही वाचलत का ?

The post रत्नागिरी : शाळा, अंगणवाड्या सौरऊर्जेने उजळणार appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here