सावंतवाडी ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ते 7 मे या कालावधी पहिल्यांदाच कोकण चित्रपट महोत्सव होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना वाव देण्याबरोबरच येथील पर्यटनाला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न आहे, अशी घोषणा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी गुरुवारी केली. ते हॉटेल मँगो येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अमोल चौगुले, अवी सामंत, विजय राणे, यश सुर्वे, हार्दिक शिंगणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते. या महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यात निवडक दहा चित्रपट दाखविण्यात येतील, त्यातील प्रथम 3 क्रमांकाच्या चित्रपटांचे मानांकन करून त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे श्री. पाटकर म्हणाले.

पाटकर म्हणाले, या महोत्सवाचा फायदा जिल्ह्याचे पर्यटन व स्थानिक कलाकारांना होणार आहे. खरेतर कोकण ही कलारत्नांची खाण आहे. भारतीय व मराठी चित्रपट सृष्टीतील 55 टक्के कलाकार हे मूळ कोकणातील आहेत.

मात्र, हे कोकणवासीयांना माहीत नाही. त्यामुळे या महोत्सवाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या कोकणातील कलाकारांची ओळख करून दिली जाणार आहे. तर स्थानिक कलाकारांना या क्षेत्रात प्राधान्याने आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील कलाकारांना होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील कलाकारांना घेऊन आम्ही सिंधुरत्न कलामंच संस्था स्थापन केली आहे.

या संस्थेच्या माध्यमातून पुढील काळात कोकणात जास्तीत जास्त चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जेणेकरून येथील पर्यटन जगाला कळेल व स्थानिक कलाकारांना संधी, रोजगार उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here