
मंडणगड : पुढारी वृत्तसेवा
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेला आकाश अनंत कोबनाक शनिवारी मंडणगडमध्ये सुखरूप पोहोचला. भिंगळोली येथील त्याच्या निवासस्थानी त्याचे पालक तसेच नातेवाईकांनी जंगी स्वागत केले. युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाल्याने आकाशने सहकारी मित्रासमवेत 25 फेब्रुवारीला मायदेशी परतीच्या प्रवासास सुरुवात केली होती. युक्रेन सीमेवर तीन दिवसांचा कालावधी गेल्यानंतर त्याला अखेर रोमानियात प्रवेश मिळाला. तेथून भारत सरकारने व दुतावसाने प्रवास व निवास व दिल्ली येथे जाण्यासाठी विमान उपलब्ध करून दिल्यानंतर राज्य शासनाने दिल्लीतून मुंबईला व तेथून सुखरूप घरी आणून सोडल्याचे आकाशने पत्रकारांना सांगितले.
युद्धग्रस्त युक्रेनमधून आकाश कोबनाक हा मेडिकलचा विद्यार्थी आपल्या घरी सुखरूप पोहोचल्यानंतर पालक अनंत कोबनाक यांनी केंद्र तसेच महाराष्ट्र शासनानेच आभार मानले आहेत. अतिशय भीतीच्या वातावरणात व जीविताला भय असताना केंद्र शासनाने केलेली मदत व आपला पाल्य घरी सुखरुप आल्याने झालेला आनंद शब्दात वर्णन करता येणार नसल्याचे सांगितले.दरम्यानच्या काळात प्रशासनाने पालकांशी संपर्क साधत वांरवार धीर दिला व ख्याली खुशाली सांगत समन्वय साधल्याचे सांगितले. परिवार नातेवाईक व तालुकावासीयांच्या आमच्या कुटुंबियांप्रती असलेल्या सदिच्छांमुळे आकाश मायदेशी आपल्या घरी सुखरुप आलेला असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान, आकाश वास्तव्यास असलेल्या भिंगळोली येथील सेंटर पार्क सोसायटीकडून आकाशचे औक्षण व पुष्प वर्षाव करुन व फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे आपण भारावून गेलेलो असल्याचे आकाशने सांगितले.
मंडणगडचे तहसीलदार नारायण वेगुर्लेकर, निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे व कर्मचार्यांनी आकाशचे घरी जाऊन पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सेंटर पार्कने आयोजित केलेल्या स्वागत समारंभास अध्यक्ष सादीकअली वलेले, तौफिक कडवेकर, कुमार अष्टमकर, दिनेश झोरे, नीळकंठ राठोड, कांतू चव्हाण, दिलीप मराठे, शांताराम पवार, भगवान बागूल रुपेश मर्चंडे व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.