महाड (रायगड) पुढारी वृत्तसेवा
कारखान्याच्या नावे महाडमधील आयडीबीआय बँकेत बनावट खाते उघडत, कंपनीच्या नावाने येणारे पैसे या खात्यात वळवले आणि बँक व्यवस्थापक, कर्मचार्‍याच्या मदतीने ८८ लाखांचा अपहार केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनी जनरल मॅनेजर, बँक व्यवस्थापक व कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत महाड शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती, मंगेश रामचंद्र शितोळे (रा. तळेगांव) हा ए.के. आर. इंडस्ट्रिज प्रा.लि. जनरल मॅनेजर म्हणून काम करीत होता. याने आयडीबीआय बँकेच्या महाड शाखेचा व्यवस्थापक प्रथमेश मनोहर शिगवण ( रा. डोंबिवली ) आणि निलेश भारती ( पूर्ण नाव उपलब्ध नाही ) यांच्या मदतीने आयडीबीआय बँकेच्या महाड शाखेत ए.के.आर. इंडस्ट्रिज प्रा.लि. या कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडले होते.

कंपनीत जमा होणारा पैसा प्रथमेश शिगवण हा बनावट खात्यात भरला. त्यानंतर स्वतः च्या, निलेश भारती त्याचप्रमाणे आपली पत्नी मानसी शितोळे यांच्या खात्यामध्ये वळवून ८७ लाख ७९ हजार ५३ रुपयांचा अपहार केला आहे. हे बनावट खाते उघडण्यासाठी शितोळे याने कंपनी संचालकांच्या बनावट सहीची कागदपत्रे, कॅनरा आणि स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या बनावट ना हरकत प्रमाणपत्रांचा वापर केला होता.

तब्बल वर्षभरानंतर हा अपहाराचा प्रकार लक्षात आला. यानंतर कंपनीने केलेल्या तक्रारीनुसार मंगेश शितोळे, बॅक व्यवस्थापक प्रथमेश शिगवण, निलेश भारती व मानसी शितोळे यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६२, ४७१,१२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल लाड तपास करीत आहेत.

हेही वाचलत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here