
राजापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रानतळे येथील सड्यावर संशयास्पदरीत्या मृत्यू झालेल्या राजेश वसंत चव्हाण (वय ४०, रा. चव्हाणवाडी, राजापूर) याच्या खूनाचा अवघ्या बारा तासाच्या आत छडा लावण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी सलमान मोहमद सलमानी (वय २५, रा. उत्तरपदेश, सध्या राजापूर) याला अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली. (Ratnagiri)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चव्हाणवाडी येथून राजेश चव्हाण हे सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले होते. काल सायंकाळी रानतळे पिकनिक स्पॉटपासून काही अंतरावर धोपेश्वर गुरववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावरील सड्यावर त्याचा मृतदेह आढळून आला. राजेशच्या डोक्यावर गंभीर जखमा असल्याने त्याचा घातपात झाल्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्यामुळे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ तपास करण्यास सुरुवात केली. (Ratnagiri)
राजेश हा सोमवारी रात्री अन्य एका इसमासोबत रिक्षातून रानतळे येथे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासकार्य राबवत संशयित म्हणून सलमान मोहमद सलमानी याला आज सकाळी ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री परबकर यानी दिली. रूकसार हा राजापूर शहरातील एका सलूनमध्ये कामाला आहे. दरम्यान राजेश याने रूकसार याला ‘तुझ्या पत्नीचे अश्लिल व्हीडीओ माझ्या मोबाईलमध्ये असून ३० हजार रूपये दे अन्यथा मी ते व्हीडीओ व्हायरल करेन’ अशी धमकी दिली होती. (Ratnagiri)
याचा राग मनात धरून रूकसार याने सोमवारी सायंकाळी राजेश याला रानतळे येथे नेले. त्याठिकाणी राजेश याने दारू पिल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार केल्याचे पोलीस जबाबात सांगितले. राजापूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच खूनाचा छडा लावल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. (Ratnagiri)