लांजा ; पुढारी वृत्तसेवा : १७ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे. काल रात्री १२.३० च्या सुमारास तालुक्यातील पुनस बौद्धवाडी येथे घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर लांजा पोलिस ठाण्यात (दि.२२) मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाने मारलेल्या हातोड्याचा वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी झालेल्या रवींद्र रावजी कांबळे यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पुनस बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले रवींद्र रावजी कांबळे (४० वर्षे) हे पुनस ग्रामपंचायतीत पाणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते आपली पत्नी रेशमी हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असायचे. त्याचप्रमाणे मुलगा अभिजीत कांबळे याला देखील तू माझा मुलगा नाहीस असे ते वारंवार बोलून त्याला हिणवत राहायचे.

यातून प्रत्येकवेळी ते भांडण करून मुलाला अशाप्रकारे बोलत असायचे व भांडण उकरून काढत असायचे. सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रविंद्र कांबळे यांनी पत्नी रेशमी हिच्याशी नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले. तसेच मुलगा अभिजीत याला देखील तू माझा मुलगा नाहीस असे त्याला हिणवले. याचा राग येवून मुलगा अभिजीत कांबळे याने घरातील लोखंडी हातोडा घेवून वडील रवींद्र कांबळे यांच्या डोक्‍यावर मागील बाजूने जोरदारपणे प्रहार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अभिजीत कांबळे याच्यावर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

दरम्यान वडिलांच्या मृत्यूनंतर लांजा पोलिसांनी मुलगा अभिजीत कांबळे याच्यावर कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here