वैभववाडी ; पुढारी वृत्तसेवा : वैभववाडी तालुक्यात आज (दि.२३) बुधवारी दुपारनंतर सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील खांबाळे परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे आंबा, काजू बागायतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वैभववाडी शहरात आठवडे बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची व व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तसेच सध्या शिमगोत्सव सुरु असून या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली.

या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा-काजू बागायतीसह सुरंग व्यवसायावर होणार आहे. आधीच शेतकरी बागायतदार निसर्गातील बदलांमुळे चिंतेत असताना वारंवार अवकाळीचे संकट येत असल्याने ते हवालदिल झाले आहेत.

मागील काही महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा-काजू हंगाम लांबणीवर गेला होता. त्यामुळे यावर्षी बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी येण्यास उशीर झाला आहे. तर आता पुन्हा अवकाळी पाऊस दाखल झाल्याने हातातोंडाशी आलेले उत्पन्न सुद्धा निसटण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here