
दापोली पुढारी वृत्तसेवा : ज्या ज्या वेळेस किरीट सोमय्या हे कोस्टल रेग्युलेशन झोनचा (CRZ) विषय घेऊन वारंवार मुरुड येथे येत आहेत. त्या वेळेस येथील पर्यटन व्यावसायिक दबावाखाली येत आहे. सीआरझेड बाबत ज्या काही प्रशासकीय बाबी आहेत त्याबद्दल शासन स्तरावरून कारवाई होईल. यासाठी जर किरीट सोमय्यानी कायदा हातात घेतला आणि ते मुरुड येथे आले तर येथील पर्यटन व्यवसायिक रस्तावर उतरतील असा इशारा मुरुड येथील पर्यटन व्यवसायिक यांचेकडून देण्यात आला आहे. शुक्रवारी (दि २५) रोजी मुरुड येथे पर्यटन व्यवसाईकांची एक बैठक पार पडली. यावेळी या बैठकीत या व्यवसासिकांनी हा निर्धार केला आहे.
कोरोना आपत्तीनंतर तब्बल दोन वर्षानी मुरुड येथील पर्यटन व्यवसाय सावरत आहे. मात्र किरीट सोमय्या हे येथील व्यवसायावर जे दबाव आणण्याचे काम करत आहेत. या त्रासाला कंटाळून येथील सर्वपक्षीय व्यवसायिक एकवटले असून, शनिवारी (दि २६) सोमय्या यांच्या भूमिकेविरूद्ध रस्त्यावर उतरण्याची तयारी येथील व्यवसायिकांनी केली आहे. सोमय्या यांचे मुरुड येथे वारंवार येण्याने येणारे पर्यटक देखील भयभित होत आहेत. त्याचा परिणाम हा येथील व्यवसायावर झाला आहे. याबाबत येथील सर्व व्यवसायिक हे दापोली प्रांत अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन त्याच्या व्यथा मांडणार आहेत.
मुरुड येथील साई रिसॉर्ट हा बेकायदेशीर आहे आणि तो मी तोडणार यासाठी किरीट सोमय्या हे (दि. २६) रोजी दापोलीत येत आहेत. मात्र सोमय्या यांची ही भूमिका येथील पर्यटन व्यवसायिकांच्या मुळावर आली असून, येथील हजारो पर्यटन व्यवसायिक उद्वस्त होतील आणि याला किरीट सोमय्या कारणीभूत असतील, असा सूर देखील यावेळी मुरुड येथील व्यवसायिकांमधून उमटत आहे.
किरीट सोमय्या यांनी त्यांची जी काही लढाई असेल ती कायदेशीर लढावी याबाबत आमचे काहीच म्हणणे नाही. पण सोमय्या यांनी वारंवार मुरुड येथे येऊन आम्हाला त्रास देऊ नये, असे येथील व्यवसायिकांचे मत आहे. किरीट सोमय्या यांनी सीआरझेड बाबत जी भूमिका घेतली आहे. त्यामुळे व्यवसाय अडचणी येत आहेतच पण, कोकण देखील बदनाम होत आहे. याबाबत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांनी देखील सोमय्या हे कायदा हातात घेत असताना त्यांना थांबवावे, अशी विनंती येथील पर्यटन व्यवसायिकांनी केली आहे.