दापोली ; पुढारी ऑनलाईन : दापोली येथील मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी खासदार किरीट सोमय्या आणि निलेश राणे दापोलीत दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आगपाखड केली. हिंम्मत असेल तर थांबवून दाखवा; पोलिसांना कशाला पाठवून देता, असे म्हणत सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

ते पुढे म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देतो; हिंम्मत असेल तर कारवाई रोखून दाखवा. चार राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सांगितले होते देशातील भ्रष्टाचार संपवणार. त्यापद्धतीने आम्ही काम करत आहे. मी दापोलीत येऊन अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडून टाकणार आहे. ते तुम्ही वाचवून दाखवा. परब यांचे रिसॉर्ट मी तोडल्याशिवाय शांत बसणार नाही, असे आव्हान सोमय्यांनी दिले.

परब यांनी मिळवलेली संपत्ती आली कोठून याचा तपास लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हिंम्मत असेल तर आमच्याशी लढा; पोलिसांना कशाला पाठवून देता. मी परब यांचे रिसॉर्टसह त्यांचा २५ कोटींचा घोटाळा बाहेर काढणार आहे. ठाकरे सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

दरम्यान सोमय्या आणि राणे यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी दापोली पोलिस स्थानक गाठले. यावेळी किरीट सोमय्या पोलिसांसोबत स्थानकात गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी निलेश राणे आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here