
रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा: रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सातत्य वाढत चालले आहे. शनिवारीही जिल्ह्यात मळभी वातावरणाचे सावट कायम होते. बुधवारसह शुक्रवारीही रत्नगिरीत पाऊस झाला असताना शनिवारीही काही भागात हलक्या पावसाने हजेरी लावली.
गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. परिणामी कोकण किनारपट्टी भागात ढगाळ वातावरणासह वार्याचा वेग वाढला होता. कमाल तापामानात किंचित घट झाली होती.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आगामी दोन दिवस वातावरणात मळभीत कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे. त्याची तीव्रता कोकण किारपट्टीतील जिल्ह्यातही राहणार आहे. त्यामुळे तापमानाचा पारा खाली सरकुन काहीसा गारवा निर्माण झाला. मात्र, पुढील आठवड्यात सोमवारपासून (28 मार्च) वातावरण कोरडे होणार असून, उष्णतेची लाट तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण आणि काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित कपात झाली आहे.
मार्च एंड तापदायक
पुढील आठवड्यात 28 मार्चपासून उत्तर भारतात पुन्हा उष्ण लहरी सक्रीय होत आहेत. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह किनारी भागातही या लहरी सक्रीय होणार आहेत. त्यामुळे आगामी आठवड्यात मार्च एंड तापदायक ठरणाच्या चिन्हे आहेत. तसा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.