साडवली : पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे शनिवारी बावनदीमध्ये बुडून बेपत्ता झालेल्या दोघांचे मृतदेह आज (रविवार) सकाळी शोध मोहिमेदरम्यान ग्रामस्थांना सापडले. या दुर्घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील परचुरी कळंबटेवाडी येथील प्रमोद रामचंद्र कळंबटे (वय ३५ ), संकेत सहदेव कळंबटे (वय १२ ) व अन्य सात जण परचुरी येथील बावनदी मध्ये शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान पोहायला गेले होते. नदीमध्ये पोहत असताना संकेत कळंबटे याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत गेला. संकेत याला वाचविण्याच्या प्रयत्नात प्रमोद कळंबटे पाण्यामध्ये बुडाला. नदीला भरती आल्याने हे दोघेही नदीमध्ये बुडन बेपत्ता झाले. प्रमोद व संकेत यांच्याचबरोबर आलेल्या ५ जणांनी आरडाओरड केल्याने हा प्रकार ग्रामस्थांना कळला.

संगमेश्वर पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. होडीच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रमोद व संकेत हे मिळून आलेले नाहीत. काळोख पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. सकाळी ९ वाजता प्रमोद कळंबटे याचा मृतदेह  पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला.

होडीच्या सहाय्याने संकेत याचा शोध सुरू होता. १०.१५ वाजता संकेत याचा मृतदेह मिळून आला. या शोध मोहिमेत ग्रामस्थांसह संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देशमुख, सचिन कामेरकर, प्रशांत शिंदे, उशांत देशमवाड सहभागी झाले होते. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात संकेत व प्रमोद यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  प्रमोद व संकेत यांच्या आकस्‍मिक मृत्‍यूने परचुरी गाव शोकसागरात बुडाला आहे.

हेही वाचलंत का ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here