पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यात असलेल्या वाहनाला मंगळवारी (दि. २९) जोरदार अपघात झाला. आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असताना ही घटना घडली. मंत्री आदित्य ठाकरे हे सुखरुप असून त्यांच्या ताफ्यातील वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट जवळ हा अपघात घडला. ताफ्यातील दोन-तीन वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आदित्य ठाकरे हे सुखरूप असल्याची माहिती आहे.

मंत्री आदित्य ठाकरे हे आपल्या नियोजीत दौऱ्यानुसार सिंधुदुर्ग येथून रत्नागिरीला निघाले होते. या वेळी खारेपाटण येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला. प्रोटोकॉलनुसार आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्या एकापाठोपाठ एक निघाल्या होत्या. दरम्यान, ताफ्यातील एका वाहनाच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागील गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि हा अपघात घडला. दरम्यान, या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सर्वजण सुरक्षीत आहेत, अशी माहिती समजते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here