दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली तालुक्यातील वनौशी गावातील तीन महिलांच्या हत्येची घटना ताजी असताना तालुक्यातील टाळसूरे या गावातील आरती अभिषेक सणस (वय 32 ) या विवाहितेचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आरती या आशा स्वयंसेविका म्हणून गावात काम करत होत्या.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार आज (मंगळवार) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आरती सणस यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्‍या आशा सेविकेचे काम करत होत्‍या. या विवाहितेचा खून झाल्यावर तिचे सासरे मधुकर धोंडू सणस यांनी स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्यांना जखमी अवस्थेत डेरवण येथे हलविण्यात आले आहे.  आरतीचा विवाह आठ ते नऊ वर्षापूर्वी झाला असून, तिला सहा वर्षाचा मुलगा आहे.

प्राथमिक अंदाजावरून या महिलेचा खून हा जवळच्या व्यक्तीकडून झाला असल्याचा दाट संशय असून, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी काशिद, दापोली पोलीस निरीक्षक आहिरे पोलीस पथकासहीत दाखल झाले असून, तपास सुरू करण्यात आला आहे. पुन्हा एकदा महिलेच्याच खूनाची घटना दापोली तालुक्यात घडली असल्याने तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here