राजापूर ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर उन्हाळे पुंभारवाडी येथे भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. बाजीराव डोंगळे (रा. हातिवले) व विजय हरेश्वर शिंदे (रा. खडपेवाडी, राजापूर) अशी मयत तरूणांची नावे आहेत. गुरूवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव डोंगळे व विजय शिंदे हे दुचाकीवरून (एम.एच.08 ए.बी. 0277) हातिवले येथून राजापूरला येत होते. ते पुंभारवाडी येथील जितवणे धबधबा येथे आले असता समोर असणाऱ्या कंटेनरला (एम.एच.08 ए.पी.2322) ओवरटेक करत असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी ट्रकच्या चाकाखाली जाऊन सुमारे 100 फुट पुढे फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही ट्रकखाली चिरडले गेल्याने जागीच ठार झाले.

दुचाकीला धडक दिल्यानंतर या टेम्पोने समोरून येणाऱ्या राजापूर-तारळ या एसटी बसलाही धडक दिली. सुदैवाने एसटीतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र एसटीचे नुकसान झाले आहे. सदरचा आयशर टेम्पो सिंधुदुर्गातून खेड येथे जात होता. या अपघाताला कारणीभूत असलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताची खबर मिळताच पोलिसांसह अनेकांनी घटना स्थळी धाव घेतली. खासगी रूग्णवाहीकेने दोघांचेही मृतदेह राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here