दापोली; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम प्रकारे काम करत आहे. त्यातून कोकणाला झुकते माप देताना या विकास कामात कोणीही श्रेयवादातून कोकणचा विकास रोखू नका, असा मार्मिक सल्ला कामांचे श्रेय घेणाऱ्याना खासदार सुनील तटकरे यांनी दिला आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यात पर्यटन विकासासाठी ८ कोटींचा निधी खासदार सुनील तटकरे यांनी पर्यटन राज्य मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून आघाडी सरकार कडून मंजूर करून घेतला आहे. या मंजूर कामांचे श्रेय अन्य कोणी घेत असल्याने फुकटचे श्रेय घेणाऱ्याना तटकरे यांनी सल्ला दिला आहे.

ही विकासकामे मंजूर व्हावीत म्हणून खासदार तटकरे यांनी स्वतः पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. यासाठी मी स्वतः सात ते आठ वेळा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी पाटील यांचेशी संपर्क करून कामाचा आढावा घेतला आहे.

मी विधिमंडळात काम केलं आहे, मंत्री मंडळात होतो, आता संसदेत आहे. त्यामुळे एखादे काम पूर्ण कसे करायचे याची माहिती मला आहे. एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही, असे देखील तटकरे यांनी सांगितले. दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यांना विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. यामाध्यतून रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी वाव आहे. त्यासाठी पर्यटन स्थळे विकसीत होणे गरजेचे आहे. पर्यटक आले तर येथील अर्थव्यवस्था वाढेल असे तटकरे यांनी सांगितले. पर्यटन मंत्री अदिती तटकरे या देखील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा यासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून काम करत आहे. विकास कोणी आणला त्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झाला ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here