
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
ऐन एप्रिल महिन्यात मंगळवारी (दि.0५) सिंधुदुर्ग जिल्ह्याला रात्री पावसाने झोडपून काढले. बुधवारी (दि.०६) रत्नागिरीच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस रत्नागिरीत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यादरम्यान रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात कोकणात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. मार्च एंडनंतर जिल्ह्यात मळभी वातावरण तयार झाले. त्यानंतर एप्रिलमध्येही वातावरण ढगाळ राहिल्याने तापमानात घट झाली. आजही (दि.०६) रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पाऊस सदृश स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मात्र आता पुढील दोन दिवसही अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण विभागात गुरूवारी (दि.७) रोजी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही भागात विजांच्या कडकडाटसह पाऊसाची हजेरी लागणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी आणि महाराष्ट्रातील अन्य आठ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवसामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. दक्षिणमध्ये महाराष्ट्र राज्यात तुरळक तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
या जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या 10 जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला आहे. या 10 जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर काही भागात विजांच्या कडकडाटांसह पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे.