शिरगाव; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण तालुक्यातील तळसर येथील एका 40 वर्षीय तरुणावर जंगलामध्ये अस्वलाने हल्ला करून गंभीररित्या जखमी केले आहे. बाबू आबा ढेबे (40) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

बाबू ढेबे हे बुधवारी (दि. 6) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सह्याद्रीच्या डोंगरदर्‍यांमध्ये गुरे चारण्यासाठी गेले असता अचानक त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. ते बेसावध असतानाच हा हल्ला झाल्याने अस्वलाने त्यांच्या हाताला चावा घेतला असून पोटदेखील नख्याने व चावून फाडले आहे. यामध्ये बाबू हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दोन्ही हातांना अस्वलाने फाडले आहे. शिवाय पोटामध्ये गंभीर जखम झाली असून तत्काळ त्यांना शिरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अधिक उपचारासाठी कामथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या बाबतची माहिती तळसरचे पोलिसपाटील महेश कदम यांना देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व सरपंच मयूर खेतले यांनादेखील याबाबत कल्पना देण्यात आली आहे. यानंतर वन विभागाला ही माहिती कळविण्यात आली असून वन विभागाचे कर्मचारी जखमी बाबू ढेबे यांची माहिती घेण्यासाठी कामथे रुग्णालयात दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here