कुडाळ; पुढारी वृत्तसेवा :  गेले चार महिने थंड असलेला लग्नाचा धुमधडाका आता पुन्हा मे महिन्यात सुरू होणार आहे. गेल्या चार महिन्यात लग्नाचे केवळ 17 मुहूर्त होते, तर मे महिन्यात लग्नासाठी 11 मुहूर्त असल्याने लग्नाचा थंड पडलेला धडाका आता पुन्हा एकदा दिसणार आहेत.

गेले दोन वर्षे कोरोनामुळे लग्न समारंभांना ब्रेक लागला होता. कोरोनामुळे शाही विवाहसोहळे कचाट्यात सापडले होते. तर अनेक ठिकाणी मर्यादित मंडळींच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली होती. यामुळे अनेक जण हिरमुसले होते. यावर्षीही एप्रिल, मे महिन्यात कोरोनाचे संक्रमण वाढण्याच्या भीतीने नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातच विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात पार पाडले. त्यामुळे अनेक ठिकाणी घरीच विवाह सोहळे आयोजित करण्यात येत होते. यामुळे हॉल व्यवसायावरही मोठा परिणाम झाला.

मात्र, कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर विवाह सोहळ्यावरील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, या कालावधीत निर्बंध शिथिल झाले असले तरी गेले चार महिने विवाह मुहूर्तच नसल्याने विवाह सोहळ्यांना मुहूर्तांचाच ब्रेक लागला होता. जानेवारीत विवाह मुहूर्त 5 , फेब्रुवारीमध्ये केवळ 2, मार्चमध्ये 4 , तर एप्रिलमध्ये 6 मुहूर्त होते. गेल्या चार महिन्यांत केवळ 17 मुहूर्तावर लोकांना समाधान मानावे लागले होते. मात्र, लग्नांचा थंड झालेला धडाका आता पुन्हा मे महिन्यात वाढणार आहे. मे महिन्यात 11 मुहूर्त आहेत. तर हाच धुमधडाका जूनमध्येही सुरू राहणार आहे.

जूनमध्ये विवाहांसाठी 10 मुहूर्त असणार आहेत. जूनमध्ये मेघराजाच्या साक्षीने लग्नाच्या गाठी बांधण्यात येणार आहेत. बहुतांशी वेळा मार्च, एप्रिल, मे महिन्यात विवाह सोहळ्यांना बहर येतो; तर जून, जुलै महिन्यात विवाहसोहळ्यांची धूम ओसरते. मात्र, यावर्षी जूनमध्येही विवाहांचा जोर असणार आहेत. त्यामुळे आता गेले चार महिने शांत असलेले हॉलवाले, डीजे, बँजो, कपडे व अन्य वस्तूंचे व्यापारी पुन्हा एकदा नव्या दमाने सज्ज झाले आहेत. लग्न म्हणजे प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. यासाठी चाकरमानी ही मोठ्या प्रमाणात गावात दाखल असतात. त्यामुळे रेल्वे व खासगी एसटी बसचेही बुकिंग फुल झाले आहे. यावर्षीचा मे महिना धुमधडाक्याचा व उत्साहाचा असणार आहे. कोरोनानंतर प्रथमच मे महिना निर्बंध मुक्त असणार आहे. त्यामुळे यावर्षी मे महिन्यात अनेक कार्यक्रमांनाही बहर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here