खेड (जि.रत्‍नागिरी), पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषद कारभारात गैरवर्तन केल्या प्रकरणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षे अपात्र करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले आहेत.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तत्कालीन गटनेते प्रज्योत तोडकरी व अन्य आठ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची सुनावणी ११ ऑक्टोबर रोजह ना. शिंदे यांच्या समोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली होती. नगरविकास मंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम मधील तरतूदीनुसार दिनांक ७ एप्रिल पासून ६ वर्षाचा कालावधी समाप्त होईपर्यंत नगरपरिषद सदस्य म्हणून निवडले जाण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.

तसेच, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर आदेश वैभव खेडेकर यांना प्राप्त झाल्यापासून चार आठवड्याच्या कालावधीनंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना खेडेकर म्हणाले, मी शिवसेनेत प्रवेश करावा म्हणून अनेक डाव खेळण्यात आले. त्यापैकीच हा एक डाव होता. मी शिवसेनेत येत नाही म्हटल्यावर हा निर्णय अपेक्षित होता. माझा नगराध्यक्ष पदाचा कालावधी मी पूर्ण केला आहे. या निर्णयाविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे खेडेकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here