वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : कोकिसरे-नारकरवाडी येथे मनोरुग्ण तरुणाकडून पोलिसावर प्राणघातक चाकूहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पोलिस रमेश नारनवर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पडवे येथील एसएसपीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी रात्री 9.30 वा.च्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अंकुश देवकर हे सेवानिवृत्त वायरमन कोकिसरे-नारकरवाडी येथे कुमारस्वामी यांच्या घरी पत्नी व मुलगा राजरत्न अंकुश देवकर यांच्यासह भाड्याने राहतात. राजरत्न हा उच्चशिक्षित असून, गेले काही दिवस त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. तो सतत आई-वडिलांसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण करत असे. शनिवारी दुपारी असेच क्षुल्लक कारणावरून आई-वडिलांसोबत भांडण केले. तर वडिलांच्या पोटावर पायरीने मारून दुखापत केली. त्यानंतर दोन हातात दोन चाकू घेऊन तो घरात बेभान झाला. त्याला आवरणे अवघड झाले होते. अखेर आईवडिलांनी त्याला मनोरुग्ण रुग्णालयात नेण्यासाठी 108 अ‍ॅम्बुलन्स बोलावली. मात्र तो अ‍ॅम्बुलन्समध्ये बसण्यास तयार होईना. त्यामुळे घरमालक कुमार स्वामी यांनी याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती दिली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वैभववाडी पोलिस ठाण्याचे पोलिस रमेश नारनवर, शैलेश कांबळे, कृष्णात पडवळ, हरिश्चंद्र जायभाय हे कोकिसरे-नारकरवाडी येथे पोहचले. त्यांनी राजरत्न याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांना बघून त्याने घराचा पुढचा दरवाजा बंद केला. पुढचा दरवाजा बंद केल्यामुळे तो मागच्या दाराने बाहेर येईल म्हणून पोलिस घराच्या मागच्या दरवाजाजवळ गेले. मागचा दरवाजा पोलिसांनी बंद केला. मात्र दरवाजावर लाथ मारुन दरवाजा तोडून तो बाहेर आला. लागलीच रमेश नारनवर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत राजरत्न याने नारनवर यांच्यावर पाठीत चाकूने दोन वार केले. तोपर्यंत इतर पोलिसांनी झडप घालून त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. त्याला पकडून वैभववाडी पोलिस ठाण्यात आणले. तर नारनवर यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल केले. पाठीवर चाकूने केलेले वार खोलवर असल्यामुळे अधिक उपचारासाठी त्यांना आधी ओरोस व नंतर पडवे येथील एसएसपीएम रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर मनोरुग्ण तरुणाला ओरोस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसावरच प्राणघातक हल्ला झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस कृष्णात पडवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी राजरत्न अंकुश देवकर (वय 29) याच्यावर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here