दापोली; पुढारी वृत्तसेवा : कोकण किनारपट्टीवर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेल्या ‘प्रथमा’ नामक मादी कासवाने गेल्या दोन महिन्यांमध्ये 250 कि.मी. अंतर कापले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही मादी गुजरातच्या सागरी परिक्षेत्रामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रथमच सागरी कासवांना सॅटलाईट टॅग’ करण्यात आले असून कोकणात अंडी घातल्यानंतर त्यांचा सागरी प्रवास सुरू आहे.

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील त्यांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी ‘मँग्रोव्ह फाऊंडेशन’ आणि भारतीय वन्यजीव संस्थानने पाच मादी कासवांना ’सॅटेलाईट ट्रान्समीटर’ लावले. मंडणगडमध्ये वेळासमध्ये ‘प्रथमा’, आंजर्ले येथे ‘सावनी’ आणि गुहागरमध्ये ‘रेवा’, ‘लक्ष्मी’, ‘वनश्री’ या कासवांच्या पाठीवरील कवचावर ’सॅटलाईट ट्रान्समीटर’ लावनू त्यांना समुद्रात त्यांच्या सागरी प्रवासासंदर्भातील अभ्यास करण्यासाठी सोडण्यात आले होते. यामधील ‘लक्ष्मी’ वगळता इतर चार मादी कासवांचा समुद्रातील प्रवास सुरू आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी’ कासवावरील ‘सॅटेलाईट’मध्ये बिघाड झाल्याने किंवा तिचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याने तिच्या प्रवासाची माहिती मिळणे बंद झाले आहे.

इतर चार कासवांमधील ’प्रथमा’ने गेल्या दोन महिन्यांमध्ये वेळासपासून सरळ रेषेत उत्तरेकडे 250 कि. मी. अंतर कापल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here