
खेड, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी वाळंजवाडी येथे शुक्रवारी (दि.१५) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तवेरा चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या चरात तवेरा उलटली. या अपघातात गाडीतील सहा जण गंभीर जखमी झाल्याने, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी (दि.१५) तवेरा मोटारीतून मुंबई येथून रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे फुटाणे कुटुंबीय जात होते. यावेळी मोटारीतून स्वाती विजय फुटाणे(४६), किरण विजय फुटाणे (२७), रश्मी रवींद्र मालगुडे (३७), विजय मारुती फुटाणे(५१), राजेश गणेश कहारे(३५) व काजल विजय फुटाणे (२५, सर्व रा.बोरिवली) हे प्रवास करत होते. मोटार मुंबई-गोवा महामार्गवरून जाताना तवेरा गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून, खेड तालुक्यातील कळंबणी वाळंजवाडी येथे मोटार रस्त्याच्या बाजूला उलटली.
घटनास्थळी मदत ग्रुपच्या स्वयंसेवकांनी मदतीसाठी धाव घेतली. या अपघातातील जखमी प्रवाशांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. तवेरा गाडीच्या चालकाला झोप अनावर झाल्याने, हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. महामार्गावरून ही तवेरा गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात कोसळली.