खेड; पुढारी वृत्तसेवा : कोकणातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे औद्योगिक वसाहतीत (शनिवार) मध्यरात्री नंतर प्रिव्ही कंपनीत आग लागल्‍याची घटना घडली. यावेळी एका पाठोपाठ एक झालेल्या स्फोटामुळे परिसर हादरून गेला. या आगीत एक कामगार भाजला असून, कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील सर्वात मोठी रासायनिक कारखाने असलेली औद्योगिक वसाहत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे येथे आहे. गेल्या दोन वर्षात या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यातून आग लागून काही कामगारांना प्राण गमवावे लागले आहेत, तर काही जण जायबंदी झाले आहेत. या दुर्घटनांमुळे लोटे पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान शनिवारी दि १६ रोजी मध्यरात्री नंतर प्रिव्ही कंपनी (जुनी रत्नागिरी केमिकल) या कंपनीत प्रक्रिया सुरू असताना अचानक आग लागली.

यावेळी एक कामगार भाजला गेला. (रविवार) पहाटे पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न लोटे औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दल करत होते. या आगीत कंपनीची लाखो रुपयांची हानी झाली आहे. आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आगिवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. कंपनीतील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, घटनास्थळी नागरिकांसह पोलीस व प्रशासनाचे अधिकारी पोहोचले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here