
दापोली; पुढारी वृत्तसेवा : एस.टी. संपाचा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी चांगला फायदा करून घेतला आहे. दापोलीत या ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची आर्थिक लुटमार सुरूच आहे. या लुटमारीमुळे गरजू प्रवासी आर्थिक तोट्यात जात आहेत. त्यामुळे या आर्थिक लुटीला कुठेतरी वचक बसणेदेखील गरजेचे आहे, असे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.
खासगी ट्रॅव्हल्सच्या मालकांकडून दरवर्षी सणासुदीच्या दिवसांचा फायदा घेत सुरू असलेल्या लुटीकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका या आधी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. खासगी बस, ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांकडून करत असलेली अवास्तव भाडे आकारणी थांबवावी आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 67 नुसार सरकारने विविध मार्गावरील भाडे निश्चित करावे, असे निर्देशदेखील न्यायालयाने दिले आहेत. तरीदेखील याबाबत विचार होताना दिसत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांची लूट कोण थांबवेल? अशी विचारणा आता नागरिक करत आहेत.
याबाबत आरटीओ विभागात सामान्य नागरिकांनी तक्रार केल्यास त्या तक्रारीची दखल योग्य पद्धतीने घेतली जात नसल्याचे दिसत आहे. दापोलीत अनेक ट्रॅव्हल्स गाड्या या परिवहन नियमात नसून, त्यादेखील बिनधास्त व्यवसाय करत आहेत. मात्र, यावर कुठे तरी आरटीओ विभागाकडून लक्ष देण्याची गरज आहे, असे नागरिक सांगत आहेत.
याबाबत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी लक्ष घालून बेकायदेशीर ट्रॅव्हल्स मालकांना चाप बसवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.
वाहतूक पोलिसांचा सामान्यांवर बडगा
दापोलीत वाहन पार्किंगचा बडगा सामान्यांवर उगारला जातो. दापोलीतील बस स्थानकाशेजारी, उप जिल्हा रुग्णालय या ठिकाणी खासगी ट्रॅव्हल्सची पार्किंग केली जात आहे. वाहतुकीला अडथळा होत असतानाही येथील वाहतूक पोलिस टॅव्हल्स चालकांना कधीही नियम सांगत नाहीत. मात्र एखाद्या दुचाकीवाल्याने रस्त्याच्या बाजूला गाडी लावली की वाहतुकीस अडथळा म्हणून त्यांच्याकडून दंड घेतला जात आहे. त्यामुळे दापोलीत पोलिसांच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.