मंडणगड (रत्नागिरी) : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानवतावादी विचारांची समाजाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे यांनी व्यक्त केले. मंडणगड येथे ६ व्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

मानवतेला केंद्रबिंदू मानून महाराजांनी राज्य केले. कुशाग्र व कुशल गुण असणाऱ्या लोकांना आपल्या स्वराज्यात सामावून घेतलं. त्यांची राजवट ही सर्वसमावेशक होती. महाराजांना आपल्या राजकारणासाठी जातीय व धार्मिक चौकटीत बंदिस्त करू पहाणाऱ्या दांभिक लोकांनी सत्तेसाठी मांडलेला संगीत खुर्चीचा खेळ निषेधार्ह व समाजविघातक आहे. छत्रपती शिवाजी महाराज चरित्रातून ऊर्जा घेऊन एकसंध समाजासाठी मोठया सामाजिक प्रयत्नांची सध्या खूप आवश्यकता आहे, असे मत गोरे यांनी यावेळी मांडले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मंडणगड शाखेच्या वतीने घेतलेल्या या संमेलनाची सुरूवात मंडणगड किल्ल्यावरून शोभायात्रा काढून झाली. त्यानंतर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन समारंभात ८ विविध पुस्तकांचे व संमेलन स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विचारपीठावर सुप्रसिद्ध अभिनेत्री गौरी महाजन, साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, कोकण प्रदेश अध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे, सुप्रसिद्ध साहित्यिक किशोर टिळेकर, सूर्यकांत नामगुडे, प्रदेश संघटक अमोल कुंभार, स्वागताध्यक्ष राजेंद्र प्रसाद मसुरकर, उद्घाटक विकास शेटये, संयोजक संदीप तोडकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here