
खेड ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूण दिशेने भरधाव जाणार्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना धामणदेवी गावाच्या हद्दीत मंगळवारी (दि. 19 रोजी) सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले असून पोलिस शोध घेत आहेत.
या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी घाटात मुंबई-गोवा महामार्गावर धामणदेवी गावाच्या हद्दीत मंगळवार सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास तळोजा येथून लोटे येथे जाणारा ट्रक (क्र. एमएच-04-डिके-7258) वरील अज्ञात चालकाने अन्य वाहनाची बाजू काढताना रस्त्याच्या चुकीच्या बाजूला समोरून येणार्या दुचाकीला (एमएच -08-ए व्ही -3726) धडक दिली. अपघातात दुचाकी चालक अथर्व मोहन सावंत (25, रा. पेढांबे तालुका चिपळूण) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी पोलिस कर्मचार्यासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच कशेडी महामार्गाची सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर यांनी ही पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी घेतली. पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेची पाचारण केले.
यावेळी जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका तसेच अपघाताची खबर मिळताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष श्री प्रसाद गांधी, नवनाथ घोलप घटनास्थळी पोहोचले. तेथे पोलिस मित्र मुकुंद मोरे, सनी जाधव, विघ्नेश जाधव यांनी घटनास्थळी मदत केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
या घटनेत ट्रकची धडक एवढी भीषण होती की, दुचाकी ट्रकच्या पुढील भागात पूर्णपणे अडकलेली होती दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे पाहिला मिळाले या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले पोलिस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.