रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा ; एस.टी. कर्मचार्‍यांनी शुक्रवारी संप मागे घेतल्यानंतर सलग चार दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने कर्मचारी सोमवारपासून हजर होऊ लागले आहेत. यावेळी तब्बल 600 कर्मचारी हजर झाले होते. त्या पाठोपाठ मंगळवारी 450 कर्मचारी नव्याने हजर झाले असून, आता जवळपास 2 हजाराहून अधिक कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती रत्नागिरी एस. टी. विभागाने दिली.

एस. टी. विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटकही झाली त्यामुळे आता कर्मचार्‍यांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजर होण्यास सुरुवात केली आहे. आता जवळपास 2500 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मेडिकल आणि अपिल प्रक्रिया यामध्ये थोडा वेळ गेल्याने 100 टक्के कर्मचारी हजर झालेले नाहीत, मात्र आता 70 ते 80 टक्के कर्मचारी जिल्ह्यात हजर झालेले आहेत. येत्या दोन दिवसात 100 टक्के कर्मचारी हजर होतील. दरम्यान, आता बडतर्फ झालेले 200 कर्मचारी हजर होणे बाकी असून बुधवारी संध्याकाळपर्यंत हेही कर्मचारी हजर होतील, अशी माहिती रत्नागिरी विभागाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here