खेड; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी जिल्ह्यात जेवढ्या शेतकर्‍यांनी वीज जोडणी मागितली आहे, त्यापैकी निम्या लोकांना महावितरणने जोडणी दिली नाहीत तर महाराष्ट्रदिनी आंदोलन करण्याचा इशारा सोमवारी दि. 18 रोजी दिला आहे. सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या माजी आमदारांनी जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा इशारा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

खेड तालुक्यात 100 हून अधिक शेतकर्‍यांनी वीजजोडणीसाठी मागणी केली असून त्यांना वाट पहावी लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी पक्षाने सरकारी पातळीवर प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता येथील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी या प्रकाराला महावितरण कंपनीला जबाबदार धरत सोमवारी दि 18 रोजी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत राष्ट्रवादी कार्यालयात महावितरणचे अधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांची बैठक घडवून आणली.

या बैठकीत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्याकडे भ्रमणध्वनी वरून समर्क करून अधिकार्‍यांना सूचना करण्याची विनंती केली. यावेळी माजी आमदार कदम यांनी अधिकारी व मंत्री यांना जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे वीज जोडणी न मिळाल्यास महाराष्ट्रदिनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा, दिला आहे. यावेळी महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे व पोलिस कर्मचारी देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here