
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सध्या वार्षिक परीक्षेची धामधूम सुरू आहे. दुसर्या बाजूला मात्र, 2018 पासून मुख्यालयी राहत असल्याचा दाखला देण्याची सक्ती जि.प. च्या शिक्षण विभागाने केली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांत हा दाखला जमा करण्याची सूचना करण्यात आल्याने परीक्षा सोडून काही शिक्षकांना या दाखल्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंचायतराज समिती मे महिन्यात जिल्हा दौर्यावर येणार असून या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा अजब फतवा काढण्याचे समोर आले आहे.
दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभाराची पाहणी करण्यासाठी पंचायतराज समिती येते. या समितीला अधिकारीही तेवढेच कडक आहेत. समजा एखाद्या विषयात दोष आढळला तर संबंधित अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्याचे अधिकार समितीला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था घाबरून असतात. सध्या ही समिती मे महिन्यात जिल्हा दौर्यावर येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेची आतापासूनच धावपळ सुरू झाली आहे.
या पंचायतराज समितीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक मात्र सध्या चांगलेच कामाला लागले आहेत. शिक्षण विभागाने फतवा काढला असून हे कागदपत्र जमा करण्यासाठी शिक्षकांची दमछाक झाली आहे. 18 एप्रिल रोजी हा फतवा काढला. यामध्ये 2018 पासून 2022 पर्यंत मुख्यालयी रहात असल्याचा दाखला, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या स्वाक्षर्यांनी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षीची स्वतंत्र फाईल, 2018 पासून शाळा व्यवस्थापन समितीने शाळांच्या बैठका घेतल्याबाबतचे संपूर्ण वर्षाचे इतिवृत्त, शालेय पोषण आहाराचे रजिस्टर आदी कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना फतव्यात आहेत. 20 तारखेपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यालयात ही कागदपत्र जमा करायची आहेत.
सध्या वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. त्याची धावपळ सुरू आहे. असे असताना दोन दिवसांत ही सर्व कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर प्रत्येक शिक्षक सध्या या कामातच गुंतलेला दिसत आहे. बहुतांश शिक्षकांच्या बदल्या झाल्याने मुख्यालयीचा दाखला मिळवताना अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित गावात जाऊन हा दाखला घ्यावा लागत आहे.
परीक्षेकडे लक्ष की कागदपत्रांकडे?
शिक्षण विभागाने ही कागदपत्रे जमा करण्याची दोन दिवसांचीच मुदत दिल्याने अनेक शिक्षक अडचणीत आले आहेत. कागदपत्रे जमा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच वार्षिक परीक्षा सुरू झाल्याने त्याकडे लक्ष द्यायचं की कागदपत्रांकडे? असे प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभं राहिलं आहे. अनेक शिक्षक तर परीक्षा सोडून कागदपत्रे जमा करण्याच्या कामात गुुंतलेले दिसत आहेत.