रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरापासून उत्तर तामिळनाडू आणि पुढे दक्षिण पश्चिम गुजरातपर्यंत आणि अरबी सागरात चक्रीय वाताची स्थितीप्रभावी असल्याने मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी भागात गुरुवारपासून चार दिवस विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोकणात बहुतांश भागात तापमान वाढले असले तरी राज्याच्या अन्य विभागाांच्या तुलनेत उष्णतेची तीव्रता कमी आहे. तरीही गुरुवारपासून चार दिवस किनारपट्टी अवकाळी पावसाच्या प्रभावाखाली आहे. या कालावधीत सर्वच भागात सरासरी कमाल तापमानात दोन ते चार अंशापर्यंत वाढ झाली असली तरी अरबी सागरातील चक्रीय स्थिती किनारपट्टीलगत असलेल्या गावात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी तापमान 33 अंश असून येत्या चारदिवसात यामध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी कमाल तापमान 28 अंश सेल्सियपर्यंत होते. तरीही रात्री कमालीचा उकाडा होता. मात्र, येत्या चार दिवसात अवकाळी सत्र असल्याने उकाड्यात कपात होऊन वाढीव तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यासह एप्रिलमध्येही तापमानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचत आहे. उष्ण लहरींच्या दोन टप्प्यांमध्ये उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण होते. मात्र, मध्यंतरी मळभयुक्त स्थितीने कोकणातील वातावरणातील पारा खाली घसरत सरासरीपर्यंत स्थिरावला होता. त्या नंतरही काही भागात तापमानाचा पारा चढाच राहिला आहे. मात्र, आगामी चार दिवस तापमानात किंचित घट दिसून येणार आहे. मुंबईसह कोकण विभागात सध्या कमाल तापमान सरासरीच्या आसपास नोंदविले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here