
रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : प्राथमिक शिक्षकांचे लक्ष लागून राहिलेल्या सुगम – दुर्गम शाळांची अंतिम यादी अखेर तयार झाली आहे. 686 शाळा दुर्गम ठरल्या असून 2 हजार 8 शाळा सुगम ठरल्या आहेत. मात्र ही यादी पुढल्या वर्षी होणार्या बदल्यांसाठी लागू होणार आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी शासनाने सुगम-दुर्गम शाळांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी ही प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम शिक्षण विभागाकडून केले जात आहे. जिप.च्या एकूण शाळा 2 हजार 694 असून सहा हजार शिक्षक आहेत. दुर्गम भागात तीन वर्षे काम केलेल्या शिक्षकांना पुन्हा सुगम भागात नियुक्ती दिली जाते. दुर्गम भागात सातत्याने नियुक्ती होऊ नये यासाठी ही यादी बनविली जात आहे.
ऑनलाईन प्रक्रियेमुळे एका क्लिकवर बदल्या होणार असून त्याचे अधिकार स्थानिक पातळीवर राहणार नाहीत. प्रक्रिया राबवताना दुर्गम भागातील शाळांची यादी निश्चित करण्याचे काम गेली काही महिने सुरु होते. त्यासाठी सात निकष देण्यात आले होते. त्यात अधिक नक्षलग्रस्त किंवा पेसा गाव, सरासरी पर्जन्यमान 2000 मिलीमीटर पेक्षा अधिक किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावे, हिंस्र वन्य प्राण्याचा हल्ला झालेली गावे, राज्य महामार्गापासून दूर असलेल्या शाळा, दुरध्वनीद्वारे संपर्क न होणार्या यांचा समावेश आहे. नव्या निकषानुसार 686 शाळा दुर्गम क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्या असून 2008 शाळा सर्वसाधारणमध्ये आहेत. रत्नागिरीत एकूण 331 शाळा आहेत.
बिबट्याचा मनुष्यावर हल्ला झालेल्या दहा शाळांचा समावेश होता; मात्र दुर्गमसाठी आवश्यक तीन निकषांची पुर्तता झालेली नसल्याने त्यांचा विचार झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. अंतिम यादी तयार करण्यापूर्वी हरकती मागवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातून 450 जणांनी हरकती नोंदवल्या होत्या; परंतु हरकती घेताना त्या-त्या विभागाचे आवश्यक पुरावे जोडलेल्या नसल्यामुळे बहुतांश हरकती फेटाळण्यात आल्या.