रत्नागिरी/कणकवली; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण आता पूर्ण झाले असून १ मे पासून विजेच्या इंजिनवर रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास जलद आणि प्रदूषण विरहित होईल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला. दरम्यान पहिल्या टप्प्यात दहा गाड्या सोडण्यात येणार असून डिझेलवर धावणार्‍या सर्व रेल्वे गाड्या विजेवर सुरू केल्यानंतर तब्बल १५० कोटींची बचत होईल, असेही रेल्वे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

कोकण रेल्वेने १०० टक्के विद्युतीकरण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोकण रेल्वे प्रशासनाचे कौतुक करत अभिनंदन केले होते. आता मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत १ मे पासून पहिल्या टप्प्यात दहा गाड्या विजेच्या इंजिनाने चालवण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे कोकणवासीयांचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि वेगवान होईलच तसेच कोकणचे नैसर्गिक सौंदर्य सुद्धा अबाधित राहण्यास मदत होईल. तर प्रवाशांच्या वेळेचीही बचत होणार आहे.संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर ६ ते ७ वर्षांपासून
विद्युतीकरणाचे काम सुरू होते. गेल्या काही महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव-थिविम या मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी याबद्दलची तपासणी केली होती. त्याच्या आधी कारवार-ठोकूर आणि रोहा-रत्नागिरी या टप्प्यांचे विद्युतीकरण झाले होते. मुंबई ते रत्नागिरी असे कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यामुळे मालगाड्या आणि दिवा-रत्नागिरी पॅसेंजर विद्युत इंजिनावर चालवली जाते. विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.यात मांडवी, जनशताब्दी, कोकणकन्या, मस्त्यगंधा, नेत्रावती, मंगला एक्सप्रेस, मडगाव पॅसेंजर, मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि दोन राजधानी एक्सप्रेस या गाड्या विजेच्या इंजिनावर धावणार आहेत.

तब्बल १५० कोटींची बचत

डिझेलवर धावणार्‍या सर्व रेल्वेगाड्या विजेवर सुरू केल्यानंतर तब्बल
१५० कोटींची बचत करणे शक्य होणार आहे, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here