रत्नागिरी/दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
काजू बीचा हंगाम आता ओसरत आला आहे. यामुळे बाजारपेठांमध्ये काजूची आवक घटली आहे. मात्र, दुसरीकडे काजू बी खरेदी दरात दिवसागणिक वाढ होत आहे. या व्यवसायाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या साटेली-भेडशी बाजारपेठेत शनिवारी काजू बीला प्रतिकिलो 142 रु.दर मिळाला. चालू हंगामातील हा सर्वोच्च दर आहे. काजू उत्पादकांनी वाढलेल्या दराबाबत समाधान व्यक्‍त केले. मात्र, हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात झालेली हर दरवाढ शेतकर्‍यांसाठी फायदेशीर नसल्याने शेतकर्‍यांमधून नाराजी दिसून येत आहे. तर या वाढलेल्या दराचा व्यापार्‍यांना चांगला फायदा होणार आहे.

कोकणातील शेतकर्‍यांसाठी काजू उत्पादन हे ‘कॅश क्रॉप’ मानले जाते. काजूगर निर्यातीमुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळत असल्याने काजू ला कोकणचे ‘व्हाईअ गोल्ड’ म्हणजेच पांढरे सोने म्हणूनही संबोधले जाते. बागायती शेती म्हणून गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत जिल्ह्यातील पडीक जमिनीवर काजूची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात काजू बीचे उत्पादन लक्षणीय वाढले असून दरवर्षी या उत्पादनात वाढ होत आहे. मात्र मागील तीन ते चार वर्षांपासून या काजू उत्पादनाला प्रतिकूल हवामानाचा फटका बसत असून उत्पादनाला उतरती कळा लागली आहे.

अवकाळी पाऊस, लहरी हवामान यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट झाली असून गेली दोन- तीन वर्षे सरासरी 40 ते 50 टक्केच काजू उत्पादन मिळाले आहे.  यावर्षी तर काजू उत्पादनात आणखी घट झाली असून सरासरी 25 ते 30 टक्के उत्पादन आले आहे. यात आणखी दुर्दैव म्हणजे उत्पादनात घालेल्या घसरणीबरोबरच काजू बी चे दरही कमालाचा घसरला आहे. चार वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी खरेदी दर 160 ते 170 रु. प्रति किलो पर्यंत पोचला होता. मात्र त्याच दरम्यान आफ्रिकन काजूची आयात सुरु झाल्याने व हा काजू स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने कारखानदार आफ्रिकन काजू खरेदी करु लागले. परिणामी काजू बी खरेदी दरात वेगाने घसरण झाली. गेली चार वर्षे हा दर सरासरी 110 ते 120 रु. किलो होता.

या वर्षीही सुरुवातीला काजू बी खरेदी दर 120 रु. किलो होता. गेल्या काही दिवसात तो 127 ते 130 रु. किलो असा स्थिरावला होता. मात्र आता हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात काजू बी दराने चांगली उसाळी घेत सरासरी 140 रु. दर गाठला आहे. मात्र शेतकर्‍यांनी या पूर्वीच काजू बी. ची विक्री केल्याने या वाढलेल्या दराचा फायदा शेतकर्‍यांना फारसा होणार नाही. दुसरीकडे काजू बी खरेदी करण्यार्‍या व्यापार्‍यांना याचा चांगला फायदा होणार आहे. आठ ते दहा टक्के काजूगर खाण्यासाठी वापरला जातो. मात्र हॉटेल इंडस्ट्री, मिठाई, आईस्क्रीम, बेकरी या ठिकाणी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. इतर प्रदेशातील काजूच्या तुलनेत कोकणातील काजूला चव चांगली असते. त्यामुळे कोकणातील काजूला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकर्‍यांची असते आणि ती योग्यच आहे.

काजू बी खरेदी दर निश्‍चित करण्याची गरज

कोकणातील शेतकर्‍यांसाठी काजू उत्पादन हे गोल्डन पिक असते. मात्र काजूच्या या दरात कधीच सातत्य नसल्याने याचा आर्थिक फटका सर्वसामान्य काजू उत्पादक शेतकर्‍यांना बसत आहे. परिणामी शेतकरी हताश होत आहे. मोठ्या काजू उत्पादकांना दरवर्षी काजू खरेदी करणार्‍या व्यावसायिकांकडून योग्य दर मिळतो. त्यामुळे काजूचा हंगाम सुरू होताच काजूचा योग्य व शेतकर्‍यांच्या दृष्टीने दर निश्‍चित करून दिल्यास शेतकर्‍यांना याचा नक्‍कीच फायदा होऊ शकतो, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here