रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बुधवारी पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रत्नागिरी शहर पोलिस स्थानक अंतर्गत शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय मुस्लिम समाजाने जाहीर केला.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वधर्मीय लोक एकोप्याने राहतात. त्यांच्यातील हा सलोखा कायम राहावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीकरांना केले आहे. यावेळी शांतता कमिटीच्या सदस्यांनी मुस्लिम समाजाच्या या निर्णयाचे कौतुक केले.
बुधवारी पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दि. 3 मे रोजी रमजान ईद, अक्षय्य तृतीया हे दोन सण साजरे करण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज येथे एकोप्याने राहतात. शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवत सर्वांनी उत्साहात सण साजरे करावे, असे आवाहन डॉ.गर्ग यांनी उपस्थितांना केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनीही रत्नागिरीत हिंदू-मुस्लिम बांधव लहानपणापासून एकत्रित रहात आहे. भोंग्याचा आवाज मर्यादित झाल्यास मनसेचा कोणताही आक्षेप नाही. आम्ही सर्व समाजाचे बांधव एकत्रितपणे आमचे सण, उत्सव साजरे करणार असल्याचे स्पष्ट केले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध धर्माचे, जातीचे लोक वास्तव्याला आहेत. परजिल्ह्यासह राज्यात, देशात कोणतीही अनुचित घडली तरीही येथील सर्वधर्मियांचा सलोखा यापूर्वीही कायम राहिला आहे, यापुढेही कायम राहील, असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.
सोशल मीडियाचा वापर करणे हा प्रत्येकाचा हक्क असला तरीही आपल्या पोस्टमुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची आहे. व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिननेही या बाबत आपल्या सदस्यांना सूचना द्याव्यात. केवळ सणांपुरते नव्हे तर कायमस्वरूपी सर्वधर्मियांमध्ये सलोखा राहील. यासाठी सर्व रत्नागिरीकरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी केले.
शांतता समितीच्या या बैठकीला श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र उर्फ मुन्ना सुर्वे, भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, कर्मचारीनेते सुधाकर सावंत यांच्यासह पोलिस अधिकारी, पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
निर्णयाची अंमलबजाणी काही दिवसात
शांतता कमिटीच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजाच्यावतीने रफिक बिजापूरकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. मशिदीवरील भोंगे काढण्याचा विषय राज्यात गाजत असताना रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी आहुजा कंपनीची अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहाटेच्या सुमारास अत्यंत कमी वेळात व कमी आवाजात अजान दिली जाईल, तर इतर वेळीसुद्धा मर्यादित आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होणार असल्याचे श्री. बिजापूरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here