देवगड : सूरज कोयंडे :  एकीकडे अवकाळी पावसामुळे देवगड हापूसवर फळमाशीचा प्रादुर्भाव वाढल्याने हापूस आंब्याची झालेली वाताहात तर दुसरीकडे वाशी मार्केटमध्ये आंब्याचे दर गडगडल्याने बागायतदारांवर संकटाची कुर्‍हाड कोसळली आहे. गुणवत्तावान उत्पादन नसल्यामुळे एक्सपोर्टकडेही कल कमी आहे. फळमाशीच्या हल्ल्याने हापूस आंबा धोक्यात आला आहे. यामुळे बागायतदारांना मोठ्या प्रमाणात आंबा कवडीमोलाने कॅनिंगला देण्याशिवाय सध्या पर्याय नसल्याची खंत बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसानंतर बागायतदारांनी लाखो रुपयांची फवारणी केली.त्यानंतर एप्रिलमध्येही आंबा तयार होण्याचा स्थितीत असतानाच पुन्हा अवकाळी घात बनून आला. 15 मेनंतर अ‍ॅक्टिव होणारी फळमाशी अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्येच अ‍ॅक्टिव झाली व आंब्याचे होत्याचे नव्हते करून गेली.

देवगडमधील आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी याबाबत दै. ‘पुढारी’ला सांगितले की, अवकाळी पावसामुळे फळमाशीचा प्रादूर्भाव प्रचंड वाढला.पाऊस येणार हे माहीत नसल्याने कीड व्यवस्थापनाबाबत शेतकरी अनभिज्ञ राहिला. अचानक पडलेल्या पावसाने एकात्मिक कीड व्यवस्थापन उपाययोजनेकडे जितके लक्ष देणे गरजेचे होते तसे झाले नाही. फळमाशांपासून बागा संरक्षित करणे आवश्यक होते यासाठी बागायतदारांनी अवकाळी पाऊस पडण्यास सुरूवात झाली तेव्हापासून फळमाशीचा अ‍ॅटॅक रोखण्यासाठी झाडांना फी रोमन ट्रॅप लावणे आवश्यक होते. या ट्रॅपला डीडीव्हीपी औषध लावल्यास फळमाशी मरून पडते.हे ट्रॅप हेक्टरी 718 ठिकाणी लावणे आवश्यक आहे. तसेच फळमाशीनी डंख मारून पडलेले आंबे गवतामध्ये घेऊन जाळले तर अंडी नष्ट होतात व फळमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येतो हा उपाय करणे आवश्यक आहे.

फळमाशींनी अ‍ॅटॅक केलेले आंब्यामध्ये अळ्या असतात.ग्राहकांना आंब्यामध्ये अळ्या दिसल्यानंतर ग्राहक पुन्हा आंबे घेत नाहीत. असे आंबे परदेशातही निर्यात करणे धोक्याचे आहे. फळमाशीच्या अ‍ॅटॅकमुळे तयार झालेला आंबा 100 टक्के धोक्यात असून आंब्याची पूर्णत: वाताहात झाली आहे. 50 टक्के आंबा अद्याप शिल्लक आहे, मात्र, मार्केटमध्ये दर नाही. त्यामुळे बहुतांशी बागायतदार आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, नागपूर, यवतमाळ, नाशिक या ठिकाणी विक्रीसाठी नेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

देवगड हापूसची आसामवारी

देवगड हापूस हा जगप्रसिध्द असल्याने आसाममधील एका ग्राहकांने थेट संपर्क साधून देवगड हापूस आंबा खरेदी केला आहे. देशाच्या राजधानीतही देवगड हापूसला प्रचंड मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here