खेड : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-गोवा महामार्गावरील उधळे गवानजीक मंगळवारी झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकजण ठार तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. खासगी आराम बस चालकाला झोप अनावर झाल्याने बसने बोलेरो पिकअप व्हॅनला धडक दिली. त्या नंतर ती बोलेरो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरवर मागून जाऊन आदळली. या अपघातात बसमधील एक प्रवासी ठार तर बसमधील अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरा अपघात लवेल आणि आवाशी गावांदरम्यान घडला. मालवाहून टेम्पो चालकालाही झोप अनावर झाल्याने टेम्पो रस्ता सोडून नजीकच्या खड्ड्यात उलटला. या अपघातातही चालक जखमी झाला आहे. तर तिसरा अपघात भोस्ते घाटात वळणावर रत्नागिरीहून गुजरातच्या दिशेने जाणार्‍या मालवाहू ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून वळणावर ट्रक उलटला.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार विरार येथून प्रवासी घेऊन लांजा येथे जाण्यासाठी निघालेली खासगी आरामबस (एमच04 जेके 9772) मंगळवारी दि 3 रोजी पहाटे 3.30 वा.कशेडी घाट उतरून महामार्गावरील उधळेनजीक आली असतना चालक सिद्धेश सदानंद शेट्ये (रा. वाकेड) याला झोप अनावरण झाल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बसची पुढे असलेल्या बोलेरो पिकअप (एमएच0 8 ए.पी. 3291) व्हॅन, मोटार (एमएच04 जेके 2753) व इनोव्हा कार (एमएच 06 ए. एन. 8442) ला जोरदार धडक बसली.

या अपघाता पिकअपची व्हॅनला मागून धडक बसल्याने पिकअप चालकाचाही गाडीवरील ताबा सुटला आणि पिकअप व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या टँकरवर आदळली. या अपघातात पिकअप व्हॅनचा बोनेट टँकरच्या चेसीखाली घुसला. भरधाव वेगातील खासगी आराम बसने जेव्हा पिकअप व्हॅनला धडक दिली तेव्हा बसमधील प्रवाशी झोपेत होते. अचानक जोराचा धक्का बसल्याने प्रवासी सीटच्या लोखंडी बारवर आदळल्याने बसमधील रोशन हरी सरफरे (28 रा. भू ता. राजापूर) याच्या डोक्याला मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील आणखी तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघात प्रकरणी पोलिसांनी बसचालक सिद्धेश शेट्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अपघाताच्या दुसर्‍या घटनेत लवेल आणि आवाशी गावांच्या दरम्यान चालकाचा झोपेत असतान मालवाहू टेम्पोवरील ताबा सुटला आणि तो टेम्पो रस्त्याकडेला असलेल्या खोल खड्ड्यात उलटला आहे. या अपघातातही चालक जखमी झाला आहे. खेड पोलिसांनी अपघातग्रस्त खासगी बस चालकाला ताब्यात घेतले असून दोन्ही अपघातांची खेड पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

अपघाताच्या तिसर्‍या घटनेत महामार्गावरील भोस्ते घाटातील मोबाईल टॉवरजवळील धोकादायक वळणावर दुपारी 1 च्या सुमारास रत्नागिरीहून अहमदाबाद येथे जाणारा मालवाहू ट्रक (एमएच 08 एपी 0993) उलटला. या अपघातात कोणाला दुखापत झाली नसली तरी ट्रकचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here