गुहागर : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्याच्या हंगामासाठी घाऊक प्रमाणात सुकी मासळी विकत घेण्यास झुंबड उडताना दिसून येत आहे. पावसाळ्यात मच्छिमारी बंद असल्यामुळे मासळी खाण्याची आवड असणारे सुकी मासळी विकत घेऊन ती पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी साठवून ठेवतात. यंदा मात्र या सुक्या मासळीचे दरही कडाडले आहेत.

बहुतांश मच्छी विक्रेते शृंगारतळी आठवडा बाजारात विक्रीस बसत असून, काही मच्छी विक्रेते गावोगावी वाडीवस्तीवर फिरून विक्री करीत आहेत. सुकी मासळी जरी महाग असली तरीही ती विकत घेताना लोक दिसून येत आहेत. यामध्ये सुका कोलीम 250 रुपये किलो, बली 400 रुपये किलो तर काड सुमारे 600 रुपये किलो दराने विकली जात आहे.सुके बोंबील 500 ते 600 रुपये तर सोलेली कोलंबी 900 रुपये किलोने विकली जात आहे. यासोबतच सुकवलेली सुरमईसुद्धा 800 ते 1000 रुपयांना आणि खारे बांगडे 100 रुपयांना 5 ते 8 विकले जात आहेत. महागाई सर्वच बाबींमध्ये वाढत असल्याने सुकी मासळी देखील आता चढ्या भावाने विकली जात आहे. मात्र, असे असतानाही सुकी मासळी आवडीने खाणारे खवय्ये ती विकत घेताना दिसून येत आहेत. एकीकडे ओली मासळी महाग असतानाच सुकी मासळीदेखील महाग झाल्याने खवय्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात ओले मासे मिळत नसल्याने कोकणामध्ये सुकी मासळी खाल्ली जाते. यामध्ये खारवलेल्या माशांचा देखील समावेश असतो. विशेषकरून कोकणात येणारे पुणे, मुंबईकर चाकरमानी आणि पर्यटक देखील सुकी मासळी विकत घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here