चिपळुण अतिक्रमण

चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वर्दळीच्या रस्त्याकडेने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढू लागली असून, मुख्य बाजारपेठेसहीत काविळतळी परिसरापर्यंतच्या दोन कि.मी. भागात रस्त्याच्या दुतर्फा भाग अतिक्रमणांनी वेढला गेला आहे. नगर परिषद अतिक्रमणे हटविण्यासाठी केवळ घोषणाबाजी करीत असून, अधूनमधून फुंकर मारल्यासारखी अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवित आहे.

शहरात बाजारपेठेसह मुख्य वर्दळीच्या प्रमुख मार्गांवर हातगाडी व्यवसायासह विविध प्रकारच्या चारचाकी गाड्यांवरील व्यावसायिक, विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. फेरीवाल्यांसह रस्त्याच्या कडेने विविध वस्तू, खाद्यपदार्थ विकणारे, पानटपरी आदी दुकाने दिवसेंदिवस वाढत आहेत. जानेवारी महिन्यात न.प. प्रशासनाने जाहीर नोटिसा देत अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधितांना सूचना दिली होती. मात्र, गेल्या पाच महिन्यात न.प. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याबाबत कोणतीही कठोर अंमलबजावणी केली नाही. केवळ फुंकर मारल्यासारखे अतिक्रमण हटविण्याची छोटीशी कारवाई करून प्रशासन पाठ फिरवत आहेत. त्याचा गैरफायदा घेत सध्या मोठ्या रस्त्याशेजारी बसणार्‍या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे.

बाजारपेठेतील व्यावसायिक, व्यापारी आपल्या दुकानात व्यवसाय करतात तर काही व्यापारी दुकानातील माल पार्किंगच्या मोकळ्या जागेत ठेवून व्यवसाय करीत आहेत. एकप्रकारे या अतिक्रमणांमुळे वाहने उभी करण्यास जागा उपलब्ध होत नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाक्यापर्यंतच्या परिसरात रस्त्याच्या कडेला ठाण मांडलेल्या विक्रेत्यांमुळे देखील ग्राहकांची रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी होत आहे. मटण, मच्छीपासून ते कांदा, लसूण, फळे, भाजी विक्रेत्यांनी संपूर्ण शहराचे मुख्य वर्दळीचे रस्ते काबीज केले आहेत.

गेल्या पाच महिन्यांत प्रशासनाने फक्त हवेत पोकळ घोषणा करून अतिक्रमणे हटविण्याबाबत अल्टिमेटम देण्याचे काम सुरू ठेवले आहे. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाकडून बोटचेपी धोरण व काही ठराविक व्यावसायिकांना सांभाळण्याचे अर्थपूर्ण धोरण चालू ठेवल्याने शहरात दिवसेंदिवस अतिक्रमण करणार्‍यांचा धीर चेपला आहे.

The post चिपळुणात अतिक्रमणांचा ‘बाजार’ appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here