सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा
शाळा दुरुस्तीसाठी शासनाकडून अद्याप निधी प्राप्‍त झाला नसल्याने यावर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना गळक्या आणि धोकादायक इमारतीमध्ये शिक्षण घ्यावे लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 1437 प्राथमिक शाळांपैकी सुमारे 600 हून अधिक शाळांचा छप्पर दुरुस्ती व वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. सन 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 234 शाळा दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. पैकी आतापर्यंत 50 टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. काही कामे तांत्रिक अडचणीमुळे सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात मुलांना बसवायचे कसे आणि कुठे? असा प्रश्‍न निर्माण होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शाळा मोडकळीस आल्या असून धोकादायक बनल्या आहेत. अशा इमारतींमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना धोका होऊ शकतो. अशा शाळांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. यासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 44 कोटी 87 लाख 80 हजार निधीची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 623 शाळांच्या वर्गखोल्या व छप्पर दुरुस्ती, 400 शाळांची स्वच्छतागृहे, 170 रॅम्प, व 115 शाळांचे दगडी कुंपण अशी एकूण 1308 दुरुस्तीची कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच यामध्ये 30 कोटी 2 लाख 2 हजार रुपये खर्चाची नवीन कामे घेण्यात आली आहेत. यामध्ये 57 वर्ग खोल्या, 123 नवीन स्वच्छतागृहे, 49 रॅम्प आणि 525 शाळांची दगडी कुंपण अशी कामे सुचविण्यात आली आहेत.

यासाठी आवश्यक 45 कोटी निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, अद्याप शासनाकडून निधी प्राप्‍त न झाल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात गळक्या इमारतीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार आहे. विविध नादुरुस्त शाळांतील मुलांची बैठक व्यवस्था करताना जिल्हा परिषद प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी 45 कोटी निधीची गरज आहे. परंतु शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. निधी प्राप्‍त होताच शाळा दुरुस्तीची कामे प्रधान्याने घेण्यात येणार आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

हेही वाचलत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here