
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: गणपतीपुळे समुद्रात शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी 4.30 वा. बुडणाऱ्या तीन पर्यटकांना तेथील जिवरक्षकांनी वाचवले. विकास जाधव (वय 46), संजना जाधव (वय 40), अंचल करंजे (वय 21) (सर्व रा.इंचलकरंजी ता.हातकणंगले जि.कोल्हापुर) अशी वाचवण्यात आलेल्या पर्यटकांची नावे आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ते देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात अंघोळ करण्यासाठी गेले होते. तेव्हा समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेसोबत खोल पाण्यात ओढले जाऊ लागले. त्यांचा आरडा-ओरडा ऐकून मोरया वाॅटर स्पोर्ट्च्या सदस्यांनी स्पीड बोटीच्या मदतीने बुडणा-या तिघांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार मधुकर सलगर यांनी गणपतीपुळे समुद्र किनारी जाऊन बुडणाऱ्या पर्यटकांची चौकशी करून त्यांना सहकार्य केले.