बांदा ; पुढारी वृत्तसेवा : गोवा-हरमल येथील खालचावडा गेस्ट हाऊसमध्ये सावंतवाडी-माडखोल येथील 30 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेला उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे रेटॉल देऊन खून केल्याचे सोमवारी सायंकाळी उघडकीस आले. ही घटना 9 ते 13 मे दरम्यान घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मृत्यूप्रकरणी संशयाची सुई बांदा शहरातील गणेश विर्नोडकर (वय 25, रा. बांदा) या युवकावर असल्याने सोमवारी रात्री या युवकाला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पेडणे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

मृत महिला ही संशयिताच्या मित्राची पत्नी असल्याचे समजते. 9 मे रोजी माडखोल येथील त्या महिलेसमवेत संशयित गणेश विर्नोडकर गेस्ट हाऊसमध्ये उतरला. त्यावेळी महिलेने आपले ओळखपत्र दिले. सोमवारी दुपारी बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे रूम बॉयने मॅनेजरला सांगितले. पोलिसांना त्याबद्दल माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत खोली उघडल्यानंतर संबंधित महिला मृत असल्याचे निदर्शनास आले.प्रेमप्रकरणातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गेस्ट हाऊसमध्ये संशयित युवकाने आपले ओळखपत्र दिले नव्हते.

13 मे रोजी रात्री दरवाजाला कुलूप लावून तो युवक निघून गेल्याचे सीसीटीव्हीतून दिसत असल्याचे मॅनेजरने सांगितले. या युवकाने गुगल पे च्या सहाय्याने रुमचे भाडे अदा केले होते. त्यामुळे पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करून संशयिताला बांद्यातून ताब्यात घेतले.

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक सुदेश नाईक व पेडणे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित संशयिताला ताब्यात घेतले आहे. महिलेचा खून प्रेमप्रकरणातून झाला की अन्य काही कारण होते याबाबत तपास सुरू आहे. या घटनेने बांदा शहरात चर्चेला उधाण आले आहे.

गुगल पेमुळे संशयित ताब्यात

गेस्ट हाऊसमध्ये ओळखपत्र मृत महिलेचे असल्याने त्यासोबत आलेल्या व्यक्तीची ओळख पटत नव्हती. सीसीटीव्हीमध्ये संशयित 13 मे रोजी रूमला लॉक करून निघाल्याचे दिसून येत होते. यावेळी मॅनेजरने रूमचे भाडे गुगल पेने केल्याचे सांगितले. यावेळी गोवा पोलिसांनी आपली यंत्रणा फिरवली आणि संशयित गणेशला बांदा येथे येऊन ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here