रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा
अंदमानात मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर आता कोकण किनारपट्टीसह अन्य सात जिल्ह्यांमध्ये जोरदार तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह पश्‍चिम महाराष्ट्रासह सात जिल्ह्यांना सावधानतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

मोसमी पावसासाठी पोषक वातावरणाच्या अनुषंगाने किनारपट्टी भागात पूर्व मोसमीच्या जोरदार सरी होण्याची अटकळ आयएमडीने वर्तविला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यांत येत्या 24 तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मोसमी पाऊस अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल झाल्यानंतर त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि अन्य सात जिल्ह्यांत होणार आहे. या भागात पूर्व मोसमीच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. या पावसाला जोरदार वार्‍याचीही साथ लाभणार असल्याने प्रशासनाने सावधानतेच्या सूचना करीत ‘यलो अ‍ॅलर्ट’ जारी केला आहे.

आयएमडीच्या इशार्‍यानुसार पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार यावर्षी वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना 27 मे रोजी केरळात मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर दोन दिवसांत म्हणजे 29 मे रोजी मोसमी पाऊस महाराष्ट्रात पर्यायाने कोकणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली आहे.

हेही वाचलत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here