रायगड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांच्या कालावधीत मासेमारीला बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश राज्याचे मत्सव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी दिले आहेत. चालू वर्षी दि. ०१ जुन २०२२ ते दि. ३१ जुलै २०२२ या ६१ दिवसाच्या कालावधीत मासेमारी करता येणार नाही, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या मासेमारी बंदी कालावधीची माहिती उरणचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, परवाना अधिकारी सुरेश बावूलगावे यांनी दिली. ११ मे ला करंजा येथे आणि १८ मे ला मुलेखंड, मोरा येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. नौका मालक, चालक आणि मच्छिमार हे या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत मासेमारी बंदी कालावधीची माहिती देताना सुरेश बावूलगावे म्हणाले कि, या कालावधीमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. तसेच या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना ही पावसाळी मासेमारी बंदी लागू नाही. मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळ्यास कठोर कारवाई करण्यात येईल. असे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, परवाना अधिकारी सुरेश बावूलगावे बैठकीत सांगितले. या बैठकीत सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, परवाना अधिकारी सुरेश बावूलगावे, विशाल कोळी, मोरा कोळीवाडा मच्छिमार सहकारी सोसायटी लि. चे व्हाईस चेयरमन सुरज किसन कोळी, सल्लागार सुरेकांत नामदेव कोळी, अजय रघुपति कोळी, विनोद कोळी, गणेश खडपे, आदी मच्छिमार, बोट मालक उपस्थित होते.

हेही वाचलत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here