चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर धोरणकर्ते बनण्यासाठी कोकणसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा कल हा सनदी अधिकारी बनण्यासाठी तयार व्हावा, असे आग्रही प्रतिपादन आम्ही गिरगावकर टीमतर्फे करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेसाठी ‘रंग दे माझी शाळा’ या उपक्रमाचा प्रारंभ उत्तर रत्नागिरीतील शाळांमध्ये नुकताच करण्यात आला.

यावेळी आम्ही गिरगावकर टिमचे अध्यक्ष गौरव सागवेकर, सचिव मिलिंद वेदपाठक, कार्याध्यक्ष विघ्नेश सुंदर, महिला सचिव शिल्पा नायक, उपक्रमाचे जिल्हा समन्वयक दीपक मोने यांची प्रमुख उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली, गुहागर येथील बारा शाळा पहिल्या टप्प्यामध्ये या उपक्रमांतर्गत सहभागी झाल्या आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा टेरव क्रमांक 1 येथे झाला.

या उपक्रमांतर्गत शाळेत आनंददायी शिक्षणासाठी वातावरण निर्मिती करणे हा हेतू आहे. आज राज्याचा विचार केला तर 280 सनदी अधिकार्‍यांपैकी केवळ 45 अधिकारी हे मराठी असतील. यामुळे धोरणकर्ती जमात निर्माण करण्यासाठी कोकण सह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासूनच यूपीएससी आयपीएससी अशा स्पर्धा परीक्षांसाठी मनोभूमिका तयार करावी लागेल. हे कार्य शिक्षकच करू शकतात, असे प्रतिपादन सागवेकर यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने व त्यांचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून हा उपक्रम सुरू असल्याचे टीमतर्फे मिलिंद वेदपाठक यांनी सांगितले. तत्पूर्वी शाळेतर्फे या टीमचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश गांधी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here