चिपळूण : समीर जाधव जून, जुलै आणि त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आता ‘दामिनी अ‍ॅप’ सरसावले आहे. वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर या अ‍ॅपकडून अलर्ट केले जाणार आहे.

भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाच्या वतीने हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून गुगल प्ले स्टोअरवर ते आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मंडल अधिकारी, महसूल विभाग, सरपंच, पोलिसपाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, कोतवाल, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक अशा सर्वांसाठी हे अ‍ॅप विशेष महत्त्वाचे आहे. हे अ‍ॅप ‘जीपीएस’ लोकेशनने काम करणार असून, वीज पडण्याच्या पंधरा मिनिटे अगोदर या अ‍ॅपमध्ये सभोवताली कुठे वीज पडण्याची शक्यता आहे, याबाबत निर्देश मिळणार आहेत.

या अलर्टनुसार प्रशासकीय अधिकार्‍यांनी संबंधित ठिकाणी पूर्वसूचना दिल्यास नागरिकांना संकटाची कल्पना येईल आणि जीवितहानी टाळता येईल. वीज ज्या ठिकाणी पडणार त्या ठिकाणचे लोकेशन अ‍ॅपवर दाखविले जाईल. 20 ते 40 कि.मी.चा परिसर दाखविला जाईल. याशिवाय अ‍ॅपवर ‘बिजली की चेतावनी नहीं है’ किंवा ‘बिजली की चेतावनी है’ यासारखे मेसेज दिले जाणार आहेत. प्रत्येक पाच मिनिटांनी याबाबत अपडेट माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला हे अ‍ॅप वापरण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या काळामध्ये लोकांना त्यातून पूर्वसूचना मिळेल आणि भविष्यातील संकट टाळता आले नाही, तरी त्यापासून होणारी जीवित व वित्तहानी वाचविण्यासाठी हे अ‍ॅप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

  • केंद्र सरकारचे ‘दामिनी अ‍ॅप’ देणार अलर्ट
  • मनुष्यहानी टळणार
  • पृथ्वी मंत्रालयाने बनविला अ‍ॅप

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here