सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा

लग्नाचे आमिष दाखवून मुंबई मालाड येथील घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिच्याकडून आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी मुंबई-मालाड पोलिसांनी गुरुवारी सावंतवाडीतून कोलगाव येथील एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई मुंबईचे साहाय्यक पोलिस निरीक्षक गजरे यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने गुरुवारी दुपारी केली. सुप्रियान डॉन्ट्स असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर मालाड पोलिस ठाण्यात बलात्कार तसेच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

कोलगाव येथील संशयित सुप्रियान डॉन्ट्स हा काही कामानिमित्त मुंबई-मालाड येथे गेला असता त्याची संबंधित महिलेशी ओळख झाली. त्यानंतर सुप्रियान हा तिच्या रूमवर राहण्यास गेला. झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने तिच्यावर अत्याचार केले व तिच्याकडून आठ लाख रुपयांची रक्कम घेऊन तिची फसवणूक केली, अशी तक्रार पीडित महिलेने मालाड पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून मालाड पोलिस ठाण्यात अत्याचार तसेच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मालाड पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक गजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक संशयिताच्या शोधासाठी सावंतवाडी शहरात गुरुवारी दाखल झाले. सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने संशयिताला पोलिस ठाण्यात बोलावून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेे, अशी माहिती सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. संबंधित महिला ही सावंतवाडी तालुक्यातील असून ती घटस्फोटित आहे व ती मुंबई येथे वास्तव्यास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here