कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा : गेली चार दशके अनंत अडथळ्यांच्या शर्यतीत अडकलेल्या घोडगे-सोनवडे घाट रस्त्याच्या अलायमेंटचे काम युद्धपातळीवर ड्रोन कॅमेर्‍याद्वारे सुरू आहे. शनिवारी हा सर्व्हे पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून देण्यात आली. दरम्यान, अलायमेंटचा हा सर्व्हे पूर्ण होताच प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर अलायमेंट निश्चित होऊन सोनवडे घाट रस्त्याचे काम गती घेईल.

सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा जोडणार्‍या 149 क्रमांकाच्या राज्य मार्गावरील घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटला काही दिवसांपूर्वीच मुख्य अभियंता संकल्प चित्र मंडळ आणि मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मंजुरी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8.13 किलोमीटर वरून 24 किलोमीटरपर्यंत नव्या अलायमेंटची लांबी जाणार आहे. गेले दोन दिवस या अलायमेंटचा ड्रोन कॅमेर्‍याद्वारे सर्व्हे सुरू आहे. शनिवारपर्यंत हा सर्व्हे पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून त्याला मान्यता घेतली जाणार आहे. तसेच प्रशासकीय पातळीवरील काम पूर्ण झाल्यानंतर घोडगे-सोनवडे घाट रस्त्याचे काम प्रत्यक्षात पावसाळ्यानंतरच सुरू होण्याची शक्यता आहे.

घाटमार्गात येणार दोन बोगदे

सोनवडे घाट मार्गासाठी नवीन सर्व्हे सुरू असून नवीन अलायमेंटमध्ये दोन टनेल (बोगदे) येणार आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना या घाटमार्गादरम्यान केल्या जाणार आहेत. एक दोन नव्हे तर अनेक दिव्यांतून या घाटमार्गाचा रस्ता पुढे जात आहे. खा. विनायक राऊत यांनी केंद्र स्तरापर्यंत विविध परवानग्यांसाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दुसरीकडे आ. वैभव नाईक यांनी राज्यस्तरावर सोनवडे घाटमार्गासाठी प्रयत्न चालू ठेवले तर कै.प्रा.महेंद्र नाटेकर यांनी तर गेली तीस-पस्तीस वर्षे या घाटमार्गाच्या रस्त्यासाठी आंदोलन करून शासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले. हा घाटमार्ग ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे त्या विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ.अनामिका जाधव यांची प्रशासकीय यंत्रणा या घाटासाठी सदैव तत्पर आहे, त्यामुळे आता प्रत्यक्षात या घाट मार्गाची अवघड वाट सुरळीत होत आहे. परिणामी आता घाट रस्त्याच्या या सर्व्हेनंतर घाट मार्गाच्या कामाला गती येणार असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here