रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
मागील वर्षभरात महामार्गावरून वेगमर्यादा ओलांडत चारचाकी वाहने चालविणार्‍या तब्बल 834 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 16 लाख 8 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी माहिती दिली.

महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने येथील आरटीओ कार्यालयाकडून रस्ते सुरक्षांतर्गत विविध कारवाई मोहीम सुरू आहे. अनेक वेळा आवाहन करूनही वाहनधारकांकडून नियमांची अंमलबजावणी होत नाही. विशेषत: बाहेरून येणार्‍या पर्यटकांची वाहनांची वेगमर्यादा अधिक असतेच, पण स्थानिक पातळीवरही काही वाहनचालक महामार्गाचे काम सुरू असतानाही वेगाने गाडी चालवतात. वेगावर मर्यादा ठेवून अपघात रोखले जाणे अपेक्षित आहे. यामध्ये आपल्या चुकीमुळे समोरच्या वाहनचालकाचे मोठे नुकसान होऊ शकते, याचाही विचार वेगाने वाहने चालविणार्‍या चालकांनी केला पाहिजे, असे आवाहन अजित ताम्हणकर यांनी केले आहे.

उपपरिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आरटीओ अजित ताम्हणकर, अविनाश मोराडे व त्यांची संपूर्ण टीम उत्तमरीत्या काम करत आहेत. या वर्षी रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर आरटीओ कार्यालयाकडून राबविण्यात आले आहे.

जवळपास सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहे. महामार्गावरच नव्हे तर सगळीकडेच वाहन चालविण्याची मर्यादा असली पाहिजे तरच अपघातापासून आपला बचाव होवू शकतो, असेही अजित ताम्हणकर यांनी सांगितले.
सध्या सुट्टीचा हंगाम सुरु असून महामार्गावर वाहनांची वर्दळ सुरु आहे. त्यामुळे वाहतूकीच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here