
महाड; पुढारी वृत्तसेवा : आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलून त्यांना जीवे मारणाऱ्या महिलेच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करुन, मुलांच्या हत्येस आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
तू आणि मुले मेलात तरी चालेल; असं म्हणत नवऱ्याने काढले बाहेर
रुना सहानी या महिलेने मंगळवारी आपल्या सहा मुलांना विहिरीमध्ये ढकलून त्यांना ठार मारले. त्याचबरोबर तिने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधीत महिलेची महिला पोलीस कोठडीत रवानगी करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावेळी तिने दिलेल्या माहितीनुसार, दारुड्या नवऱ्याकडून चारित्र्यावर संशय घेतला जात होता. त्याचबरोबर तो दररोज शिविगाळ आणि सतत मारहाण करायचा. घटनेच्या आधी नवऱ्याने, तू आणि मुले मेलात तरी चालेल असे सांगत या सर्वांना घराबाहेर काढले होते. घटनेच्या दिवशी ही महिला घरी गेली असता त्याने तिला घरात घेण्यास नकार देत पुन्हा हाकलून दिले होते. पतीच्या या छळानंतरच तिने हे क्रूर पाऊल उचलले. रुना सहानी हिच्या चौकशीतून ही माहिती पुढे आल्यानंतर याच माहितीच्या आधारे या महिलेची फिर्याद घेण्यात आली आहे.
या फिर्यादीच्या आधारे रुना सहाय हिचा नवरा चिखुरी सहाय याच्याविरोधात भा.दं. वि. कलम ३०६,४९८ अ , ५११, ३२३ , ३४१ ,५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याने रुना सहाय हिला रोशनी (वय10), करिश्मा (वय 8), रेश्मा (वय 6), विद्या (वय 5), राधा (वय दीड वर्ष) या पाच मुली आणि शिवराज (वय 3) या सहा मुलांना विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेण्यास आणि तिला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. असा गुन्हा पोलिसांनी नोंद केला आहे.
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला गावगुंडाने पाजले विष; बीडमधील संतापजनक घटना https://t.co/x7tmOysnUw #pudharinews #pudharionline #marathwada #Crime #onesidelove
— Pudhari (@pudharionline) June 1, 2022
हेही वाचा